महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर यांचा सावंतवाडी दौरा
विविध अंगणवाड्यांची पाहणी ; कामकाजाचा सविस्तर आढावा
सावंतवाडी : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा महेशकुमार नारकर यांनी सावंतवाडी तालुक्याचा दौरा करून तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालय तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने इन्सूली, वाफोली आणि बांदा येथील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली.
दौऱ्यादरम्यान सभापती नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधा, पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता आणि परिसराची बारकाईने पाहणी केली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी थेट संवाद साधत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली. अंगणवाडी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेताना भेडसावणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या तात्काळ सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अधिक गतिमानतेने काम करण्याचे निर्देशही सभापती नारकर यांनी या प्रसंगी दिले.
या दौऱ्यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सावंतवाडी शैलजा मातोंडकर, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला व बालकांच्या कल्याणासाठी सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास सभापती अनुराधा नारकर यांनी शेवटी व्यक्त केला.













