मच्छीमार नेते भालेकर यांचे मस्त्यव्यवसाय मंत्र्यांना निवेदन
गुहागर प्रतिनिधी:
मच्छिमार संस्थांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या मध्यम मुदत कर्ज, अल्पमुदत कर्ज व उलाढालीसाठी दिलेल्या थकीत अॅडव्हान्स रक्कमा, मच्छिमार क्रेडिटकार्ड तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बचत गट या सर्वांचा शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०२६ मध्ये समावेश व्हावा, अशी मागणी वेलदूर मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल भालेकर यांनी मस्त्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या मच्छिमारांची गेली कित्येक वर्षांपूर्वीची राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेतून मासेमारी नौकांचे यांत्रीकरण योजनेतून घेतलेल्या अर्थसहाय्यापैकी काही मासेमारी नौकांची कर्जे थकीत आहेत. त्यापैकी बहुतांशी नौका नष्ट झाल्या असून नौकेचे गटप्रमुख आणि गट सदस्यही यामध्ये नाहीत. तरी अशी असलेली थकीत कर्ज ही माफ करण्यात यावीत. तसेच मागील काही वर्षातील दुष्काळ सदृश परिस्थिती व मासेमारी हंगामासाठी बंदी काळाची मुदत वाढवल्यामुळे मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची तरतूदही यानिमित्ताने करण्यात यावी अशी मागणी मच्छीमारांच्यावतीने भालेकर यांनी केली आहे.













