गुहागरात शाळांच्या किचन शेड नादुरुस्तीची समस्या

पोषण आहार शिजवण्यासमोर अडचण
गुहागर प्रतिनिधी:
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या ‘शालेय पोषण आहारा ‘च्या स्वच्छतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ७१२ शाळा असून, त्यापैकी तब्बल ४०० शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्धच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. स्वयंपाकघर नसल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांच्या व्हरांड्यात, उघड्यावर किंवा जुन्या पडक्या खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांचे जेवण शिजवले जात आहे.. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नवीन किचन शेड उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शालेय आहाराची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासण्याची मोहीम राज्यभर तीव्र करण्यात आली आहे. नियमानुसार, पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १२ ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १०० ग्रॅम तांदूळ व पूरक आहार, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २० ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो. मात्र, रत्नागिरीत शेकडो शाळांमध्ये हे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नाही आणि शिजवण्यासाठी किचन शेड नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारीचा विचार केल्यास खेड तालुक्यात सर्वाधिक १०० शाळांना स्वयंपाकघर नाही. त्यापाठोपाठ लांजा तालुक्यात ७०, तर गुहागर तालुक्यात ५९ शाळांमध्ये किचन शेडची सुविधा नाही. नगरपरिषद क्षेत्रातील ३३ पैकी २५ शाळांमध्ये हीच परिस्थिती आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नवीन किचन शेड उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शिक्षण विभाग आणि अन्न व औषध विभागाने संयुक्तपणे यावर उपाययोजना करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.

किचन शेडपासून वंचित शाळा

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नसल्याचे तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता, खेड तालुक्यात सर्वाधिक १०० शाळांमध्ये किचन शेड नाही, तर लांजात ७०, गुहागरमध्ये ५९, चिपळूणमध्ये ४५, रत्नागिरीत ३०, मंडणगडमध्ये २५, संगमेश्वरमध्ये २३, राजापुरात १६ आणि दापोली तालुक्यात ०७ शाळांमध्ये स्वयंपाकघराचा अभाव आहे. याशिवाय नगरपरिषद क्षेत्रातील ३३ पैकी २५ शाळा देखील किचन शेडपासून वंचित आहेत.