४० वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व
अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीकडून गौरव; प्रशिक्षक अनिकेत पाटील व सुजल गावस यांचे मार्गदर्शन
मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या ४० व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये मालवणची कु. महिमा विशाल मोहिते हिने ट्रायथलॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशासह तिने राज्यस्तरावर कांस्यपदक मिळवत सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
महिमाने राज्यातील अव्वल खेळाडूंमध्ये दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. तिच्या जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीचे हे यश मानले जात आहे.
या यशाबद्दल अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महिमाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महिमाला या यशासाठी NIS प्रशिक्षक अनिकेत पाटील आणि सुजल गावस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत “महिमाच्या मेहनतीला सलाम!” असा गौरवपूर्ण संदेश दिला आहे.













