कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर ग्रामस्थांना दिलासा
कणकवली : शहरातील कलमठ गोसावीवाडी, संचयनी व गजानन महाराज नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफार्मरचे लोकार्पण पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या परिसरातील वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने ग्रामस्थ तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः घरगुती विद्युत उपकरणे तसेच दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत होता. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर नवीन ट्रान्सफार्मर मंजूर होऊन त्याची उभारणी करण्यात आली.
नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित झाल्याने गोसावीवाडी, संचयनी आणि गजानन महाराज नगर परिसरातील नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी ट्रान्सफार्मरसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले.
लोकार्पण कार्यक्रमास सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच रवींद्र यादव, महेश लाड, सदस्य अनुप वारंग, नितीन पवार, सचिन खोचरे, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, राजेंद्र मणेरीकर, प्रमोद लिमिये, परेश कांबळी, बाबू नारकर, प्रणय शिर्के, समीर रजपूत, सिद्धेश रजपूत, आकाश पाटील, आबू पाटील, विनीत रजपूत, अमित मर्तल तसेच वायरमन राहुल काळेगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.













