‘अभिनयसम्राट ‘ नितीन आसयेकर यांच्या ‘साईबाबा’ नाटकाचा कोलझर येथे दिमाखात शुभारंभ

आकर्षक ट्रिक्सिन व अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगांव प्रस्तुत, लेखक-दिग्दर्शक नितीन आसयेकर यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांनी नटलेला ‘साईबाबा’ हा भव्य-दिव्य ट्रिक्सिनयुक्त आध्यात्मिक भक्तीप्रधान नाट्यप्रयोग काल रात्री कोलझर-टेंबवाडी येथील श्री देव ईश्वटेश्वर कलामंच येथे अत्यंत दिमाखात पार पडला. साईश्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघ, कोलझर आणि ईश्वटेश्वर मंडळ कोलझर, टेंबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या पहिल्याच शुभारंभ प्रयोगाला परिसरातील रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.

या नाटकात ‘साईबाबा’ या प्रमुख भूमिकेत अभिनयसम्राट नितीन आसयेकर यांनी अत्यंत सजीव आणि प्रभावी अभिनय साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. त्यांच्या अचूक व भारदस्त अभिनयाने आणि नाटकातील आकर्षक ट्रिक्सिनच्या प्रयोगांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांना सिद्धार्थ मेस्त्री, देवेश कूडव, स्वप्निल नाईक यांच्यासह इतर सर्वच कलाकारांनी आपल्या कसलेल्या अभिनयाची उत्तम साथ दिली. तसेच या नाट्यप्रयोगात बाल कलाकार अनुरा बादल चौधरी हिने ‘लक्ष्मी’ या भूमिकेतून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

रंगमंचावरील कलाकारांच्या अभिनयासोबतच संगीत साथीने या प्रयोगात प्राण फुंकले. दिनेश राऊळ यांची हार्मोनियमची साथ, किसन नेमळेकर यांची पखवाजवरील पकड आणि विनायक राऊळ यांची झांजची लयबद्ध साथ यांच्या उत्कृष्ट जुगलबंदीमुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. पहिल्याच प्रयोगाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली असून दशावतार लोककलेच्या प्रांगणात हा भव्य नाट्यप्रयोग प्रचंड यशस्वी ठरला आहे.