ग्रामीण भागातील एलपीजी गॅस बुकिंगची कालमर्यादा ४५ वरून २५ दिवसांवर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा

 भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश 

बांदा (प्रतिनिधी) :ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी गॅस बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा आता कमी करून २५ दिवसांवर आणण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव व श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची वाढती मागणी लक्षात घेता घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाचे भाजपा युवा मोर्चाकडून स्वागत करण्यात आले असून सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

 

यापूर्वी गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट लागू असल्याने विशेषतः एकाच सिलिंडरवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. वेळेत सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस वितरण केंद्रांपर्यंत वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. ज्यामुळे त्यांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. तसेच या मर्यादेमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अतिरिक्त दर आकारणी, कृत्रिम टंचाई आणि अनियमित वितरणाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.

 

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून बुकिंगची दिवसांची अट कमी करण्याची मागणी केली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेतली आणि ग्रामीण वितरकांसाठी असलेले बुकिंगचे निर्बंध २५ दिवसांवर आणण्याचा निर्णय झाला आहे.

 

पावसाळ्यात पर्यायी इंधनाची उपलब्धता कमी असल्याने आणि गणेशोत्सवात गॅसची मागणी आणखी वाढणार असल्याने, हा निर्णय ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व दिलासादायक ठरला आहे. भाजपा युवा मोर्चाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

———-