फणसवळे येथील गोवंश हत्या प्रकरणातील दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्‍यातील फणसवळे गावाच्या परिसरात गोवंश हत्‍या करुन त्‍याची मुंबईला विक्रीसाठी नेणाऱ्या दोन संशयितांना न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
मोहसीन बाबू कुरेशी (30,रा.मिरा रोड स्टेशन,फातिमा बिल्डिंग रुम नं 203 मुंबई पूर्व) आणि शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (48,रा.जनता सेवक सोसायटी रुम नं 303 माहिम वेस्ट मुंबई) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. बुधवार 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वा.सुमारास ग्रामीण पोलिसांचे पथक फणसवळे येथे गस्त घालत असताना त्‍यांना तीन संशयित गोवंश हत्‍या करताना दिसून आले. पोलिसांनी त्‍यांना पकडण्याचा प्रयत्‍न केला असता संशयितांनी त्‍यांच्या अंगावर गाडी घालून त्‍यांच्यावर वार करण्याचा प्रयत्‍न केला होता. परंतू पोलिसांनी जिवाची बाजी लावत शहेनशाहा शेखला घटनास्थळावरुन अटक केली होती. तर इतर दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला होता. परंतू ग्रामीण पोलिसांनी अकिधची कूमक मागवून जंगलात शोध घेतला असता त्‍यांना गुरुवारी सकाळी मोहसिन कुरेशी मिळून आला होता.
गुरुवार 3 सप्टेंबर रोजी दोन्ही संशयितांना न्यायालाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवार 9 सप्टेंबर रोजी त्‍यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्‍यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.