मालवण | प्रतिनिधी : सन २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रशासकीय उत्कृष्टतेचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार’ प्राप्त केल्याबद्दल वेदिका गोसावी यांचा मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या गौरव सोहळ्यास गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहायक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, दिपक सुर्वे, मानसी भोगावकर, रिया बावकर, सीमा परुळेकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, संतोष गावडे आणि इतर प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी वेदिका गोसावी यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस आणि भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.













