गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वाहतुकीत बदल

१२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

कणकवली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी वाहतूक नियमनाबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कणकवली शहरातील काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात कणकवली शहर तसेच परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, विसर्जन आणि उत्सवाच्या विविध कार्यक्रमांमुळे शहरातील वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, संभाव्य अपघात टाळता यावेत आणि नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी हे वाहतूक नियमन करण्यात आले आहे.

*पटवर्धन चौकातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी*

पटवर्धन चौक, कणकवली येथून कलमठ मार्गे आचरा जाणाऱ्या तसेच आचरा-कलमठ मार्गे कणकवळीकडे पटवर्धन चौकात येणाऱ्या अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.

*हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग*

पटवर्धन चौक, कणकवली ते लक्ष्मी चित्रमंदिर, पुढे कलमठ मार्गे कणकवली बाजारपेठ असा मार्ग हलकी व इतर वाहने वापरू शकतात. तसेच लक्ष्मी चित्रमंदिर ते किनई रोड, गांगोमंदिर मार्गे कणकवली बाजारपेठ असा पर्यायी मार्गही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वाहतूक नियमनातून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.