Accident Breaking: हातिवले येथे टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; सात ते आठ जण जखमी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपघात सत्र सुरू 

राजापूर : नरेंद्र मोहिते  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गणरायाच्या स्वागतासाठी कोकणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू आहे. अशातच रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले नजीक हॉटेल शिवानंदसमोर टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन सात ते आठ प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स हातिवले येथे आली असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीवर धडकली. त्यानंतर वाहन डिव्हायडरवर आदळून अपघात झाला. या अपघातात वाहनातील सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून, जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांच्या मदतीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असताना महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अपघाताबाबतचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.