देवरूख महाविद्यालयाचे प्रा. अजित देवळे यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.पदवी जाहीर

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरूख येथील प्रा. अजित विजय देवळे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर झाली आहे. महाविद्यालयाच्या स. का. पाटील आंतरशाखीय संशोधन केंद्रातून त्यांनी ही पदवी संपादन केली असून, डॉ. देवळे देवरुख महाविद्यालयातून बी.एससी. पदवी प्राप्त करून रसायनशास्त्र विषयांमध्ये पीएच.डी. करणारे पहिले विद्यार्थी ठरले आहेत. प्रा. डॉ.अजित देवळे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

करंबळेसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून आणि मराठी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या डॉ. अजित देवळे यांनी अनेक आर्थिक अडचणींवर मात करत उच्च शिक्षणाचा प्रवास पूर्ण केला आहे. शिक्षणासाठी त्यांनी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट केले. दादासाहेब सरफरे, बुरंबी प्रशालेतून एस.एस.सी.ला उत्तम गुण मिळवत गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुखमधून एच. एस. सी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून बी.एससी. पदवी, तर एम. एससी. पदव्युत्तर पदवी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातुन प्राप्त केली. गेली १० वर्ष डॉ. देवळे एम. एससी. च्या वर्गांना अध्यापन करत आहेत.

मुंबई विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पी.एचडी. संशोधनास देवरुख महाविद्यालयातून डॉ. अमित श्रीकांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली “वनस्पतींच्या अर्काचा वापर करून रुथेनियम नॅनो-कणांचे हरित संश्लेषण पद्धतीने निर्मिती, वैशिष्ट्यीकरण आणि जैविक क्रियाशीलतेचा अभ्यास(Green Synthesis Characterization and Biological Activity of Synthesized Ruthenium Nanoparticles using plant Extract)” या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनाचे चार लेख ‘स्कोपस जर्नल’ व ‘पीयर- रिव्ह्यू जर्नल’ मध्ये प्रकाशित झाले असून, एका संशोधन लेखाला ६.५ इम्पॅक्ट फॅक्टर प्राप्त झाला आहे.

प्रा. डॉ. देवळे यांचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थी, याच संस्थेतील अध्यापक आणि आता याच संस्थेच्या स. का. पाटील आंतरशाखीय संशोधन केंद्रातून पीएच.डी. प्राप्त करणारे संशोधक असा प्रगती व विकासाचा प्रवास निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. डॉ. अजित देवळे यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.