गुहागर :
गुहागर तालुक्यातील वेळंब (गुरववाडी) येथे राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी पुनम गजानन गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० ते १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. विशेष म्हणजे, चोरट्याने घराची खिडकी, कडी-कोयंडा किंवा इतर कशाचीही मोडतोड न करता घरात प्रवेश करून फिर्यादीच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरली. या चोरीत एकूण १,७१,०४२/- रुपये किमतीचा मुद्देमाल गेला असून, त्यात ९९,२९२/- रुपये किमतीचे ३३.३९० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, विविध वजनाच्या सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, कानातील झुमके, नथी, तसेच चांदीचे दागिने आणि ४,३००/- रुपये रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे













