कुणकेश्वर समुद्रकिनारी १९ सप्टेंबरला भव्य स्वच्छता मोहीम ; ग्रामपंचायतीचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

‘राष्ट्रीय किनारा अभियान’ अंतर्गत शनिवारी, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत कुणकेश्वर समुद्रकिनारा येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्वच्छता मोहिमेस जिल्हा स्तरावरील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.

आपला समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामायिक जबाबदारी आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तरी क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत न चुकता वेळेवर उपस्थित राहून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.