संगमेश्वर तालुक्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप

देवरूख (प्रतिनिधी)

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात संगमेश्वर तालुक्यात ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत गुलाल उधळत मिरवणूक काढत गौरी गणपतींना शनिवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.

तालुक्यात गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दरदिवशी भक्तीभावाने गणरायाची पूजाआर्चा करण्यात आली. या कालावधीत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दरदिवशी आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य आदि कार्यक्रम झाले. यामुळे तालुक्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत होते. पाच दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने शनिवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

तालुक्यातील गावागावांमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूकांना सुरूवात झाली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गुलाल उधळत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गणेशभक्तांनी मिरवणूकीत नाचण्याचा आनंद लुटत गुलाल उधळत विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जनस्थळी मिरवणूका आल्यानंतर बाप्पाची आरती करण्यात आली. व सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर गणरायाला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरूख, संगमेश्वर, साखरपा पोलीसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.