ऐन गणेशोत्सवात राजापुरात खरवते गावच्या पोलीस पाटलांच्याच घरावर चोरटयांचा डल्ला सुमारे ६७ हजाराचे दागिने व रोख रक्कम लांबविले

राजापूर प्रतिनिधी: ऐन गणेशोत्सव सणाच्या धामधुमीतच महामार्गालगत खरवते वाणीवाडी येथील खरवते गावच्या पोलीस पाटील सानिका संतोष गोरे यांचे घर फोडून चोरटयांनी सुमारे ६७ हजारांचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला आहे. शुक्रवारी १८ सप्टेंबर ते शनिवारी १९ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली आहे. पोलीस पाटलांच्याच घरावर चोरटयांनी डल्ला मारल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सानिका संतोष गोरे यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या खरवते वाणीवाडी येथील घराला व गेटला कुलूप लावून पती व मुलगी यांच्यासोबत आपल्या माहेरी मौजे तळवडे येथे गौरी गणपती दर्शनासाठी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या घरी परतल्या असता त्यांना गेट उघडा दिसला व घराचे कुलुपही तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. कडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून घरातील स्टडी रूम मधील व बेडरूम मधील कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरटयांनी लांबिविल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
यामध्ये 14,595 किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे प्रेस इयरिंग जोड, 3987 रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे व हिऱ्याची कुडी, 2900 किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे व हिऱ्याचे प्रेस इयरिंग, 2100 रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 3220 किमतीचे एक ग्राम वजनाच्या सोन्याच्या मुद्द्या, 5,041 किमतीचे आठ तोळे वजनाचे चांदीचे पैंजण, तीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे 67,468 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 251/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली व पहाणी करून पंचनामा केला. या चोरी प्रकरणी तात्काळ श्वानपथक ठसे तज्ञांना पाचारण करून तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख अधिक तपास करत आहेत.