ते-ये मधलीवाडीच्या एकजुटीला मिळणार हक्काचे व्यासपीठ

एकता मित्र मंडळाच्या सभागृहाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन; पाणीप्रश्नासह पर्यटन विकासावर भर

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील मौजे ते-ये येथील मधळीवाडीच्या एकता मित्र मंडळाच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामस्थांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याने या सभागृहामुळे गावाच्या सामाजिक वाटचालीला नवे बळ मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी गावात उभी राहणारी वास्तू ही केवळ इमारत नसून, त्यामध्ये गावकऱ्यांचे विचार, आठवणी आणि आपलेपणा जपला जातो, असे सांगितले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या मागणीला प्रत्यक्ष रूप देताना समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभागृहाचा उपयोग गावातील सर्व घटकांसाठी व्हावा आणि येथून समाजहिताचे विविध उपक्रम घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मधलीवाडी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासाचा सुधारित आराखडा तयार करून त्यानुसार कामे हाती घेण्यावर भर दिला जाईल, असे निकम यांनी सांगितले. परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासह नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, परिसरातील जलसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा उपयोग पर्यटन विकासासाठी करता येईल का, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. बोटिंगसह पर्यटनाच्या विविध संधी विकसित झाल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. सभागृहाच्या उभारणीमुळे गावातील कार्यक्रमांसाठी जागेची असलेली अडचण दूर होणार असून सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पंचायत समिती सदस्य आरुषी घवाळी, बंड्या पवार, अनंत घवाळी, संभाजी भुरवणे, संजय भुरवणे, प्रभाकर भुरवणे, दिलीप भुरवणे, आत्माराम गोमाणे, रणजीत गोमाणे, सुभाष भुरवणे, आज्ञेश भुरवणे, चंद्रकांत भाऊ माने, काशीराम बारगुडे, शांताराम बडवे, सुषमा भुरवणे, सविता गोमाणे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.