मंडणगड प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी गावाकडे आलेल्या गणेशभक्तांचा उत्सवाची सांगता होताच परतीचा प्रवास सुरू झाला असून, वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता रा.प. मंडणगड आगाराकडून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश व गौरी विसर्जनानंतर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाने उपलब्ध मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
मंडणगड आगाराकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १९ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण व ग्रुप बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. या चार दिवसांत एकूण १०९ प्रवाशांचे आरक्षण झाले आहे.
यामध्ये आगाऊ आरक्षणात साध्या बससाठी ५३ प्रवासी, तर जिजाऊ सेवेसाठी एकही आरक्षण नाही. तसेच ग्रुप बुकिंगमध्ये साध्या बससाठी ५५ आणि जिजाऊ सेवेसाठी १ प्रवासी, अशी एकूण ५६ प्रवाशांची नोंद झाली आहे. १९ सप्टेंबर रोजी ११, २० सप्टेंबर रोजी सर्वाधिक ८४, तर २१ सप्टेंबर रोजी १४ प्रवाशांचे आरक्षण झाले असून, २२ सप्टेंबर रोजी सध्या कोणतेही आरक्षण नोंदलेले नाही.
गणेशोत्सवानिमित्त मंडणगड तालुक्यात मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त दाखल झाले होते. गणेश व गौरी विसर्जनानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी आगाराकडून अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटी बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.












