खेळातील या सुवर्णक्षणाची कीर्ती अशीच पुढे चालू दे ! — फोंडाघाट पत्रकारांकडून कौतुक !
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चे पदाधिकारी संचालक, शिक्षकवर्ग विद्यार्थी- विद्यार्थिनी ची कृष्णाई च्या पालकांसह जल्लोषात मिरवणूक !
फोंडाघाट ( कुमार नाडकर्णी )
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल ॲण्ड सायन्स फोंडाघाटच्या इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील कंपनी सार्जंट मेजर कृष्णाई नंदकिशोर रावराणे हिने दिल्ली येथे ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प-फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेतर्फे फोंडाघाट बसस्थानक याठिकाणी भव्य सत्कार करत बस स्थानक ते गांधी चौक पर्यंत ढोलताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. फोंडाघाट मध्ये ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेली फोंडाघाटच्या संस्थेची सलग दुसऱ्या वर्षी दिल्ली पर्यंत मजल मारणारी कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे हिची मिरवणूक फोंडाघाट बाजारपेठ मधून जात असताना श्री देव राधाकृष्ण मंदिर याठिकाणी जाऊन कु. कृष्णाई हिने दर्शन घेतले याठिकाणी तिचा यथोचित सत्कार करण्यात आला. “खेळातील या सुवर्णक्षणाची कीर्ती अशीच पुढे चालू राहू देत”–अश्या शब्दात तालुका पत्रकार संघाचे सचिव संजय सावंत यांनी फोंडाघाट पत्रकार संघ तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच ठीक- ठिकाणी कित्येक ग्रामस्थांनी,महिलांनी आपल्या घरातून बाहेर येत कु.कृष्णाई रावराणे हिचे औक्षण करत, गोड मिठाई भरवत, कुणी पुष्पगुच्छ देत तर कोणी पुष्पहार घालत तर काही ठिकाणी पुष्पवृष्ठी करत येथील ग्रामस्थ तिचे अभिनंदन करत होते.
दरम्यान यावेळी तिच्या सोबत मागील वर्षी
राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक मिळवत
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची अभिमानाने मान उंचावणारी कु. मनस्या फाले, कृष्णाई चे वडील नंदकिशोर रावराणे व आई मिरवणुक वाहनामध्ये होते.फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ९ वी च्या वर्गात शिकणाऱ्या कृष्णाई रावराणे हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या, शिस्तीच्या आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून तिची सुरुवातीला निवड झाली. प्रत्येक टप्प्यावर आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडत तिने पुढील निवडीत स्थान मिळवले.
कृष्णाईच्या या यशामागे 58- महाराष्ट्र बटालियन NCC, सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज सर, AO ले. कर्नल मंडलिक सर, तसेच बटालियनमधील सर्व JCO, NCO आणि P I स्टाफ यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध शिबिरांमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, NCC विभागाचे एएनओ आर्या भोगले, मारुती लाड, क्रीडा शिक्षक अजिंक्य पोफळे यांचेही कृष्णाईला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कृष्णाईच्या अथक परिश्रमामुळे तिला प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याची संधी मिळाली.यानंतर कृष्णाईची अहमदनगर येथे आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड झाली.याठिकाणी अखेर या कठोर प्रशिक्षण व निवड प्रक्रियेतून तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेत दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आणि याठिकाणी ही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी केली.
ऐन गणेशचतुर्थी च्या उत्सवात कु कृष्णाई रावराणे हिची निघालेल्या विजयी मिरवणुकीत फोंडाघाट च्या ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण आले होते.या मिरवणुकीत फोंडाघाट एज्युकेशन संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फोंडाघाट शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.











