घरगुती गणपती सजावट स्पर्धेत योगेश घाडी, तर भजन सम्राट स्पर्धेत श्री सिद्धेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळ प्रथम

साळशी येथे गणपती सजावट व भजन सम्राट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. भाऊ गावकर घराण्याच्यावतीने स्पर्धेचे आयोजन

शिरगाव (प्रतिनिधी) –         देवगड तालुक्यातील कसबा साळशी येथे स्वर्गीय भाऊ गावकर घराण्याच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा व भजन सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही स्पर्धांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा आपल्या गावातही व्हाव्यात आणि स्थानिकांना आपल्या कलागुणांना व कौशल्याला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गाव मर्यादित असलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत योगेश घाडी यांनी ‘समुद्रमंथन’ या संकल्पनेवर केलेल्या सजावटीसाठी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ५ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रवीण नाडणकर यांनी ‘प्राचीन कोकण’ या संकल्पनेवर केलेल्या सजावटीसाठी द्वितीय क्रमांक मिळवून ३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह प्राप्त केले. वैभव घाडी व प्रशांत घाडी यांच्या ‘कोकण वाचवा’ या संकल्पनेतील सजावटीस द्वितीय क्रमांक देण्यात आला. त्यांना २ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३२ स्पर्धक सहभागी झाले होते.

भजन सम्राट स्पर्धेत श्री सिद्धेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळ, घाडीवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह मिळवले. दत्त प्रसादिक भजन मंडळ, नाईकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवून ३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह प्राप्त केले. श्री देव वशिक तळखंबा प्रसादिक भजन मंडळ, गावकरवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवून २ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह पटकावले. विठोबा प्रासादिक भजन मंडळ, सडेवाडी यांना उत्तेजनार्थ १ हजार १११ रुपयांचे पारितोषिक तसेच विशेष पारितोषिके देण्यात आली. तसेच उत्कृष्ट बुवा किरण नाईक, उत्कृष्ट पखवाज वादक अमित गावकर, चकवा सम्राट यतीन पारधी याना विशेष पारितोषिक देण्यात आली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे सन्मानचिन्ह देण्यात आले.

यावेळी माजी सरपंच वैभव साळसकर, सत्यपाल लाडगावकर, विजय नामदेव लाड, विजय अनंत गावकर, रमेश लक्ष्मण नाईक, सदानंद अनंत गावकर व रवींद्र गोपाळ लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन राजेश विजय लाड, भूषण सदानंद गावकर, रोहन रवींद्र लाड, रणजीत सदानंद गावकर, राहुल चंद्रकांत गावकर व राज चंद्रकांत गावकर यांनी केले.

यावेळी भाऊ गावकर घराण्यातील सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.