हेत गुरववाडी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
गुरव ज्ञाती समाज सामाजिक संस्थेचा स्तूत्य उपक्रम
वैभववाडी l प्रतिनिधी : समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे. ग्रामीण भागातही आता दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजबांधव ठामपणे उभे आहेत. गरिबीमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही. अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शैक्षणिक मदत केली जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा गुरव ज्ञाती समाजात बांधवांचे अध्यक्ष संजय सावंत यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही गुरव ज्ञाती समाज सामाजिक संस्था, गुरववाडी-हेत यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरववाडी-हेत येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनंत वाळवडकर होते. यावेळी माजी सभापती मंगेश गुरव, वैभववाडी तालुका गुरव ज्ञाती समाज बांधवांचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव यांच्यासह समाजातील पदाधिकारी व बांधव उपस्थित होते. यावेळी मंगेश गुरव व गुरुनाथ गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत शाळकरी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. कु. स्नेहा अशोक गुरव हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिने डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने १० हजार १ रुपयांची आर्थिक मदत संजय सावंत यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी स्नेहाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संजय सावंत गुरव यांनी ५ हजार रुपये, मंगेश गुरव यांनी ५ हजार रुपये, तर गुरुनाथ गुरव यांनी २ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाला संस्थेचे मुंबई अध्यक्ष अनंत वाळवडकर, सचिव संजय गुरव, खजिनदार सुभाष गुरव, गावच्या संस्थेचे अध्यक्ष सचिन गुरव, सचिव प्रकाश डोंगरकर, खजिनदार बाळकृष्ण वाळवडकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गुरव, आकाराम गुरव, गुरव ज्ञाती समाज मुंबईचे विवाह प्रमुख सुरेश राणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याला गुरव समाजातील बांधव, भगिनी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुरव, प्रशांत डोंगरकर यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार संजय गुरव यांनी मानले.










