दापोलीत दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला

दापोली :
तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून एका मुलाने आपल्या ६० वर्षीय आईवर आणि वडिलांवर कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०२:१५ वाजण्याच्या सुमारास जालगाव पांगारवाडी येथील फिर्यादी अनिता उर्फ निर्मला मधुकर आग्रे यांच्या घरी ही घटना घडली. संशयित आरोपी सुनील मधुकर आग्रे याने दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली होती. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने राग अनावर झालेल्या आरोपीने, आपल्या हातातील कुऱ्हाड आणि काचेची बाटली घेऊन “तुला आता जीवंत सोडणार नाही, ठार मारून टाकतो” असे बोलून शिवीगाळ केली.
तसेच, आरोपीने डाव्या हातातील काचेची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. त्यानंतर घराजवळील पडवीत बसलेले फिर्यादी यांचे पती मधुकर नारायण आग्रे यांच्याजवळ धावत जाऊन हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात व हातावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे पती यांना गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.