हिंदी भाषेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढते महत्त्व प्रशंसनीय- अनिलकुमार जोशी

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा ही भारताचा प्राणवायू असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबरोबरच देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचे महत्व वाढत आहे, असे प्रतिपादन अनिलकुमार जोशी यांनी मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या हिंदी दिन पखवाडा समारोह प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव उपस्थित होते. ७४ व्या हिंदी दिनानिमित्त महाविद्यालयात ‘राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेची उपयुक्तता आणि विश्वाच्या दिशेने प्रगती’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ, पुणेचे माजी अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार व माजी प्राचार्य अनिलकुमार जोशी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी अनिलकुमार जोशी यांनी हिंदी भाषेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व, तिची उपयुक्तता तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात हिंदी भाषेसमोरील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणाऱ्या भारताचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढत असून आज जगात हिंदी भाषेचे अध्ययन वाढले आहे.
जगात २०० पेक्षाही अधिक विद्यापीठांमध्ये हिंदी शिकवली जाते. भारतातील इतर भाषा बरोबरच हिंदी भाषेमध्ये मृदता, गोडवा आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेमधून संवाद साधतात, हे देशासाठी खूपच अभिमानास्पद आहे. हिंदी भाषेमध्ये विपुल साहित्य संपदा असून लोकांना जोडण्याची क्षमता आहे.हिंदी भाषा ही केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमिक प्रशालेच्या हिंदी विषय शिक्षिका व रत्नागिरी हिंदी मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. मुग्धा पवार यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेतील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार संधी याचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. युवराज सुभाष जाधव यांनी केले. आभार हिंदी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र माने यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. प्राजक्ता शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच हिंदीप्रेमी उपस्थित होते. उत्साहपूर्ण व ज्ञानवर्धक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.