प्रहार डिजिटलआणि दै.प्रहार, यांच्या ‘साज गौरी-गणपती’ सजावट स्पर्धेला उदंड प्रतिसाद;
रत्नागिरी:
प्रहार डिजिटल आयोजित ‘साज गौरी-गणपती’ ऑनलाइन गणेश आणि गौरी सजावट स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व व उदंड प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेसाठी केवळ रत्नागिरीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपले व्हिडिओ पाठवले आहेत.
जिल्हाबाहेरील व्हिडिओ स्पर्धेत पात्र नाही; पण सोशल मीडियावर प्रसिद्ध
ही स्पर्धा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्हिडिओंना ‘प्रहार डिजिटल’च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर प्रसिद्धी देण्यात आली असली, तरी नियमानुसार त्यांचा मुख्य स्पर्धेमध्ये समावेश करता येणार नाही, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून मिळालेल्या या भरभरून प्रतिसादाबद्दल प्रहार डिजिटलच्या वतीने सर्व रसिकांचे आणि स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
उद्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच अंतिम मुदत
अनंत चतुर्दशी म्हणजेच २५ सप्टेंबर हा या ऑनलाईन सजावट स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. ज्या स्पर्धकांनी अजूनही आपले व्हिडिओ पाठवले नसतील, त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा खुली असणार आहे. दिलेल्या मोबाईल नंबरवर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आलेले व्हिडिओच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील. त्यानंतर प्राप्त होणारा कोणताही व्हिडिओ स्पर्धेत समाविष्ट केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
लवकरच जाहीर होणार निकाल
स्पर्धेचे दिलेले सर्व नियम व अटी पूर्ण करणाऱ्या आणि नियमांत बसणाऱ्या व्हिडिओंमधूनच विजेत्यांचे क्रमांक काढले जातील. अत्यंत पारदर्शक पद्धतीने या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती प्रहार डिजिटल कडून देण्यात आली आहे.











