कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात सुरू; शहरात काढण्यात आली जनजागृीची रॅली 

कुडाळ l प्रतिनिधी :राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण अभियानाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रमांची सुरुवात करण्यात आली असून नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

शहरी भागात बाइक रॅली काढून ‘विकसित भारत २०४७’ चे उद्दिष्ट साध्य करणे तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.

 

कुडाळ शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीने उपस्थितांचे व नागरिकांचे विशेष वेधले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक आणि संदेश, तसेच जनजागृतीपर घोषणांचे फलक लावण्यात आले.

या बाईक रॅलीमध्ये नगरपंचायतीचे मा. मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ तसेच नगराध्यक्षा, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला. रॅलीच्या माध्यमातून शासनाचे विविध उपक्रम जसे की स्वच्छता ही सेवा, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, डिजिटल साक्षरता आणि लोकसहभागाची भावना शहरात दृढ करण्यात आली.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत केवळ बाईक रॅलीच नव्हे, नगरपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता ही सेवा अंतर्गत वृक्षारोपण करणे व प्लास्टिक मुक्ती जनजागृती करणेबाबत उपक्रम हाती घेण्यात आला असून, अनाथालय, जागरुकता जलसंधारण आणि जलस्त्रोत स्वच्छता करणे इत्यादी कार्यक्रम करणेत आले. तर आगामी महिन्याभरात कुडाळ शहरात वृद्धाश्रम भेट, जेष्ठनागरीकांसाठी डिजिटल साक्षरता, व्यसनमुक्त भारत, सेवा सेतू अभियान, बदलाची गोष्ट व जनसेवक महाकुंभ इ. विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

कुडाळ नगरपंचायतीच्या या पुढाकारामुळे शहरात एकच चैतन्य पसरले असून, नागरिकांमधून या अभियानाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.