कणकवलीत ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’

प्रलंबित महसुली प्रकरणांचा होणार तडजोडीने निपटारा

१६ नोव्हेंबरला तहसीलदार कार्यालयासह मंडळ अधिकारी कार्यालयांत सुनावणी

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासननिर्णयानुसार कणकवली तहसीलदार कार्यालयांतर्गत प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व इतर प्रकरणांचा त्वरित आणि गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय कणकवली तसेच तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतीने निपटारा करण्यात येणार आहे. संबंधित वादी-प्रतिवादी, अपीलार्थी, गैरअपीलार्थी आदींना नोटीस देऊन प्रकरणे प्राधान्यक्रमाने निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

या अभियानात तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या न्यायालयातील अपील प्रकरणे, अधिकार अभिलेख, कुळकायदा व फेरफार विषयक प्रकरणे, तसेच मंडळ अधिकारी स्तरावर सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी व फेरफार नोंदींच्या प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली तसेच मंडळ अधिकारी कार्यालय कणकवली, वागदे, कळसुली, तळेरे, हुंबरट, फोंडाघाट, सांगवे, खारेपाटण आणि नांदगाव येथे तडजोडीसाठी सुनावणी घेण्यात येणार आहे. संबंधित कार्यालयांमध्ये सुरू असलेले दावे, हरकती व अपील प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी त्या-त्या कार्यालयात महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, तहसीलदार कार्यालय कणकवलीने तालुक्यातील सर्व संबंधित हितसंबंधित, पक्षकार, अर्जदार तसेच नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ज्या महसूल न्यायालयात दावा प्रलंबित आहे, त्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या अभियानाचा संबंधितांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भातील जाहीर प्रकटन तहसीलदार कणकवली दीक्षांत देशपांडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.