सावंतवाडी:
सावंतवाडी बाजारपेठेतील ज्येष्ठ व जुने व्यापारी आनंद आळवे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. आपल्या दुकानाजवळ सापडलेले ३६ हजार रुपये रोकड असलेले पाकीट त्यांनी मूळ मालकाचा शोध घेऊन सुरक्षितपणे त्याच्या स्वाधीन केले आहे.
आनंद आळवे यांना त्यांच्या दुकानाजवळ एक पैशांचे पाकीट सापडले होते. त्यांनी ते पाकीट उघडून पाहिले असता त्यात ३६ हजार रुपयांची रोकड आणि एक फोटो मिळून आला. आळवे यांनी तत्परता दाखवत पाकिटात असलेल्या फोटोवरून संबंधित व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी मूळ मालकाशी संपर्क साधून ती रक्कम त्याच्या सुपूर्द केली.
आपले हरवलेले पाकीट रकमेसह सुखरूप परत मिळाल्याने मूळ मालकाने व्यापारी आनंद आळवे यांचे मनःपूर्वक आभार मानले. आजच्या काळातही आळवे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाची बातमी समजताच सावंतवाडी बाजारपेठेसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.










