परुळे – रावदस व मळई भागातील नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन घेतली माहिती
परुळे : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे – रावदस आणि मळई भागांतील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून भातपिकाच्या नुकसानीची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन भातपिकाची पाहणी केली. पावसाअभावी व दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहायक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, उपविभागीय अधिकारी कृषी अनिकेत कदम, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे, जिल्हा परिषद सदस्य याद्या साळगावकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, सरपंच निलेश सामंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रसाद पाटकर, उपसरपंच महादेव सापळे, तालुका अभियंता प्रफुल्ल शिंदे, कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी आनंद परुळेकर, कृषी सहाय्यक सूरज परब, तलाठी रजनीकांत नायकोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारीवर्ग, शेतकरी, ग्रामस्थ व महिला शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा व पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने साठवण बंधारे बांधून पाणी साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच त्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक त्या उपाययोजनांसाठी सज्ज राहावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महिला शेतकरी प्रियांका माड्ये यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासमोर आपल्या शेतीच्या नुकसानीची कैफियत मांडली. दुष्काळी परिस्थितीमुळे भातपिकाचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.












