पोषण सेल्फी पॉइंट, विविध योजनांचे भव्य स्टॉल्स आणि पौष्टिक आहार पाककृतींच्या प्रदर्शनातून जनजागृती
खेड (प्रतिनिधी) : पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खेड यांच्या वतीने तालुकास्तरीय पोषण अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव, ता. खेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महिलांमध्ये तसेच पालकांमध्ये पोषण, आरोग्य आणि शासनाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला, अंगणवाडी सेविका, विविध विभागांचे अधिकारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती खेडच्या सन्माननीय सभापती मॅडम, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार साहेब तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. मोठ्या संख्येने महिला आणि अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रमात सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आकर्षक ‘पोषण सेल्फी पॉइंट’ उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटला उपस्थित महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देणारे भव्य स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि योजनांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या स्टॉल्सच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे विविध पौष्टिक आहारांच्या पाककृतींचे मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले प्रदर्शन. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या विविध पौष्टिक पदार्थांचा आहारात कसा समावेश करता येईल, याची माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली. बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. विविध रांगोळ्यांमधून महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती, पोषणाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी माहिती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. शिरीषकर मॅडम यांनी केले. त्यांनी पोषण अभियानाची संकल्पना, उद्देश आणि त्यामागील भूमिका उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडली. कुटुंबाच्या आरोग्यामध्ये पोषणाचे महत्त्व तसेच महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषणविषयक जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. मळणगावकर यांनी पोषण आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून संतुलित आहार, आरोग्याची काळजी आणि पोषणाशी संबंधित विविध बाबींविषयी उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रभावी व माहितीपूर्ण ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रिती पवार मॅडम आणि सौ. देवता काटकर मॅडम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानदीप विद्यामंदिरचे संस्थाप्रमुख, प्राचार्य मगदूम सर, मोरे मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक, काका आणि मावशी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी उपस्थित महिला व नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामपंचायत भडगाव यांच्या वतीने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सौ. म्हातले मॅडम आणि सौ. बंडगर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध शासकीय योजनांची माहिती, पौष्टिक आहाराचे प्रदर्शन, आकर्षक रांगोळ्या, पोषण सेल्फी पॉइंट आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हा जनजागृती कार्यक्रम विशेष ठरला. महिला व अंगणवाडी सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्व संबंधितांच्या सहकार्यामुळे तालुकास्तरीय पोषण अभियान जनजागृती कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.












