शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे पोहोचविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी
देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील शेवरे तांबळवाडी येथे भातशेतीचे पाहणी

सिंधुदुर्ग, : खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील शेवरे तांबळवाडी येथे शेतकरी विठोबा घाडी यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भात पिकाची वाढ खुंटल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही घट झाल्याने शेतीवर परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. उपसभापती अमोल लोके यांनी परिसरातील पिकांची व पाणी परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या भावना आणि प्रत्यक्ष परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठीच आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेणे आवश्यक असून, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या सरसकट मदतीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, शिरगाव परिसरातील ग्रामस्थांनी शिरगाव लपा तलावाच्या गेटच्या दुरुस्तीची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. परिसरातील शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने तलावाच्या गेटची दुरुस्ती महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याची दखल घेत पालकमंत्री राणे यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना गेट दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शितल जाधव यांच्यासह जलसंधारण आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
०००००











