लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने रस्ता वाहतूक नियम (रोड ट्रॅफिक रूल्स) या विषयासंदर्भात जनजागृती शिबिर दिवाणी न्यायालय लांजा येथे पार पडले. सुरुवातीला प्रास्ताविक ॲड. मंदार बंडबे यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ते वाहतूकीचे नियम या विषयी उपस्थित लोकांना थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी.आर.भोसले यांनी लोकांमध्ये असलेली ट्रॅफिक नियम पाळण्याबाबतची उदासीनता याविषयी चिंता व्यक्त केली. ट्रॅफिकचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे सांगतानाच त्यांनी उपस्थितांना आपल्या मुलांनाही त्याबाबत वेळोवेळी जागरूक करा असा सल्ला दिला. या कार्यक्रमाला दिवाळी न्यायाधीश पी.आर. भोसले यांच्यासह पॅनेल विधिज्ञ मंदार बंडबे, तसेच ॲड. शार्धादुल धामणस्कर, राजेश गुरव, पी.जे. गुरव, दिवाणी न्यायालय लांजाचे सहाय्यक अधीक्षक (वित्त) डी.एन. कांबळे तसेच दिवाणी न्यायालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.










