४५ गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन
सावंतवाडी : गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ७.० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे, सजावटीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, ध्वनी प्रदूषण टाळणे, वीज बचत आणि कचऱ्याचे वर्गीकरण याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.
गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. बोट क्लब, निर्माण भवनजवळ, शिवउद्यानासमोरील बाजूस , भटवाडी, सर्वोदय नगर,जुस्टिन नगर, मराठा वसतीगृहाजवळ तसेच होळीचा खुंट आदी ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले.
नगरपरिषदेच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण ४५ गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले. जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.












