‘युथ फोरम’चा १८ ऑक्टोबर रोजी ‘सन्मान नवदुर्गाचा’ उपक्रम

संस्थाध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांची माहिती

नोव्हेंबरमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा

संस्थेतर्फे लवकरच युवा महोत्सवाचे आयोजन

देवगड- प्रतिनिधी

युथ फोरम, देवगड या संस्थेच्यावतीने नवरात्री उत्सवानिमित्त १८ ऑक्टोबर रोजी ‘सन्मान नवदुर्गांचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये भव्य राज्यस्तरीय पोर्टेट रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्यावतीने लवकरच युवा महोत्सवही आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवांतर्गत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांसह युवकांना विविध व्यावसायिक व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली. संस्थेमध्ये नूतन पदनियुक्त्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

युथ फोरम, देवगड या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे संस्थाध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, सहसचिव रसिका सारंग, ऋत्विक धुरी, खजिनदार सागर गांवकर, कार्यकारिणी सदस्य भूषण दातार, शहर अध्यक्ष ओमकार सारंग यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या सभेत झालेल्या महत्वपूर्ण निर्णयांची व ठरावांची माहिती अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली. ते म्हणाले, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या सहसचिव रसिका सारंग यांच्या संकल्पनेतून समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव ‘सन्मान नवदुर्गांचा’ या पुरस्काराद्वारे संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. तर १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत संस्थेच्यावतीने भव्य राज्यस्तरीय पोर्टेट रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन भरविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे. तसेच देवगडमध्ये लवकरच युथ फोरमच्यावतीने भव्य युवा महोत्सव घेण्याबाबतचा ठराव सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. शिवाय या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध व्यावसायिक व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हा युवा महोत्सव स्थानिक युवकांना दिशादर्शक राहावा व येथील सांस्कृतिक चळवळीतही एक महत्वाचे योगदान देणारा ठरावा, असा संस्थेचा मानस आहे, असे अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी स्पष्ट केले.

 

*संस्थेतील नूतन पदनियुक्त्या जाहीर*

या सभेत संस्थेच्या कार्यकारणीमध्ये व समित्यांमध्ये नवीन पदनियुक्त्या करून बदल करण्यात आला असल्याची माहिती अॅड. माणगांवकर यांनी दिली. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी सौ. आज्ञा अभिषेक कोयंडे, सोहम सुनील पारकर यांची, सल्लागार व विषेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. तन्मय सुनील आठवले, सुमित कुबल यांची, संघटकपदी कु. नुपुर लळीत, गोविंदकुमार माळी, अभिनव उदय जोशी, वीरेंद्र उर्फ सोनू मोंडकर, परिमल प्रमोद नलावडे यांची, तर सहसंघटकपदी जितेश अविनाश मोहिते, सौ. मधुरा गौरव खानविलकर, सागर पडवळ, सौरभ सुनील मोंडकर, कु. रुद्रा रवींद्र शेटये, कु. वैभवी रवींद्र घारकर यांची निवड करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या देवगड- जामसंडे शहर कार्यकारिणीतही बदल करण्यात आले आहेत. शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी चिन्मय खानविलकर यांची, तर सदस्यपदी कु. मिली बापर्डेकर यांची निवड करण्यात आली आहे. देवगड कॉलेज युनिटच्या अध्यक्षपदी कु. सलोनी संजय कदम, उपाध्यक्षपदी कु. पूर्वा चौघुले, सचिवपदी दीप सुजय नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. नाट्य महोस्तव समिती प्रमुखपदी दीपक दशरथ जानकर यांची, तर सोशल मीडिया प्रमुखपदी अॅड. श्रुती सिद्धेश माणगांवकर, समन्वयकपदी आर्यन अमृत नलावडे, गौरव काशिनाथ कांदळगांवकर, दुर्वांकुर दिनकर मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष अॅड. माणगांवकर यांनी दिली.