आंबोलीतील चमकणारी बुरशी (बायोल्युमिनेसेंट फंगी)

आंबोली – तन्मय सरमळकर : आंबोली – चौकुळच्या जंगलात रात्रीच्यावेळी चमकणारी ‘जैवप्रकाशी बुरशी’ म्हणजेच ‘बायोल्युमिनेसेंट फंगी’ सद्या आकर्षणाचा केंद्र बनत आहे. रात्रीच्या अंधारात जैवप्रकाशी बुरशी ही हिरवट किंवा काहीसा सपेद, पीवळट प्रकाशाचे नयनरम्य चित्रच दाखवते. त्यामुळे ही चमकणारी बुरशी निसर्गप्रेमीं तसेच छायाचित्रकारांना विशेष भुरळ घालते.

 

जैवप्रकाशी बुरशी म्हणजे स्वतःहून सतत थंड, हिरवट प्रकाश निर्माण करणारे सजीव. जगभरात अशा बुरशींच्या सुमारे १३० हून अधिक प्रजाती ज्ञात आहेत. त्यांपैकी बहुतेक मायसेना, ओम्फालोटस आणि आर्मिलारिया या प्रमुख गटांमध्ये मोडतात. या बुरशी प्रामुख्याने गडद, दमट उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण जंगलांमध्ये आढळतात. यावरूनच त्या परिसराची समृद्ध जैवविविधता अधोरेखीत होते. यात सह्याद्रीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग, वेंगुर्ला व आदी परिसर हा जैवप्रकाशी बुरशीचा अधिवास समजला जातो. तर पावसाळ्यासह हिवाळा व उन्हाळ्यातही चमकणारी बुरशी दिसून येते.

 

दरम्यान, जैवप्रकाशी बुरशीमध्ये ल्युसिफेरेज नावाचे एन्झाइम, ल्युसिफेरिन नावाच्या संयुगाशी आणि प्राणवायू यांच्या उपस्थितीत अभिक्रिया करते. जसे रासायनिक प्रकियाच, याच अभिक्रियेमुळे हिरवट प्रकाश निर्माण होतो. तर काजव्यांप्रमाणे या बुरशी लुकलुकत नाहीत. त्या २४ तास सतत प्रकाश उत्सर्जित करतात, मात्र हा प्रकाश आपल्या डोळ्यांना पूर्ण अंधारातच स्पष्ट दिसतो. या प्रक्रियेत निर्माण होणारा प्रकाश थंड हिरव्या रंगाचा (सुमारे ५२०–५३० नॅनोमीटर तरंगलांबीचा) असतो. या प्रकाशामुळे उष्णता निर्माण होत नाही, त्यामुळे ऊर्जा वाया जात नाही.

 

Box : या बुरशी प्रकाश का निर्माण करतात?

 

किटकांना आकर्षित करण्यासाठी ही बुरशी प्रकाश निर्माण करते. यावर अनेक शास्त्रज्ञांच्या मते, रात्री सक्रिय असणारे कीटक या हिरव्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. हे कीटक बुरशीचे बीजाणू आपल्या शरीरावर घेऊन इतर ठिकाणी पोहोचवतात, ज्यामुळे बुरशीचा प्रसार होण्यास मदत होते. तसेच दुसऱ्या मतानुसार, हा प्रकाश कोणत्याही विशिष्ट उद्देशाने नसून, मृत लाकूड विघटित करताना बुरशीच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा किंवा रासायनिक ताण नियंत्रित करण्याचा एक उपपरिणाम असू शकतो.

 

Box : सह्याद्रीतील दमट जंगलांमध्ये या बुरशी पावसाळ्याच्या मध्य व शेवटच्या काळात कुजलेल्या ओंडक्यांवर, पडलेल्या झाडांच्या खोडांवर आणि ओलसर जमिनीवर आढळतात. याच चमकणाऱ्या बुरशी प्रत्यक्षात पाहायच्या असतील, तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात रात्री, दाट आणि दमट जंगलांमध्ये, विशेषतः कुजलेल्या लाकडांवर त्यांचा शोध घेणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. तर पश्चिम घाटातील सह्याद्रीमधील जैवविविधतेतील विविध घटकांच्या नोंदी करण्याचे विशेष कार्य ‘आंबोली टुरिझम’ कडून करण्यात येत आहे.

 

Box – प्रसिद्ध काही प्रजाती

 

मायसेना क्लोरोफॉस – तेजस्वी हिरव्या प्रकाशासाठी प्रसिद्ध.

 

पॅनेलस स्टिप्टिकस – जैवप्रकाश निर्माण करणारी आणखी एक प्रसिद्ध प्रजाती.