गुहागर प्रतिनिधी :
तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार व्यावसायिकाला ती १ हजार ७०० रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामपंचायतीने परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकी चोरीची घटना कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी मालकाने संशयित चोराचा शोध घेत त्याला पकडल्याची माहिती आहे. शृंगारतळीत परप्रांतीय लोकांचा भरणा जास्त असून अद्याप ग्राम पंचायत अथवा पोलीस स्टेशनला त्यांचा आधार कार्ड अथवा वास्तव्याचा दाखला दिलेला नाही.
दरम्यान, चोरीची दुचाकी केवळ १ हजार ७०० रुपयांना खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकाचीही चौकशी करून, त्याची भूमिका तपासावी आणि दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.












