पुलावरील झाडे-झुडपांमुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका; तातडीने साफसफाईची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे उदेगवाडी मार्गावरील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या पुलावर मोठ्या प्रमाणात उंबर, पिंपळ यांसारखी झाडे तसेच विविध प्रकारची अनावश्यक झुडपे उगवली असून त्यामुळे पुलाच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे. या वाढलेल्या वनस्पतींमुळे पुलाच्या भिंती व कठड्यांमध्ये मुळे शिरून काँक्रीटला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून पुलाचे आयुर्मानही कमी होत असल्याची चिंता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सावर्डे उदेगवाडी, कासारवाडी तसेच परिसरातील इतर वाड्यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दररोज ग्रामस्थ, शेतकरी, रुग्ण, विद्यार्थी आणि विविध कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र पुलावरील झाडे आणि झुडपांची वाढ दिवसेंदिवस वाढत असल्याने पुलाची मूळ रचना धोक्यात येत आहे. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात पुलाचे मोठे नुकसान होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक व चित्रपट विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सावर्डेचे माजी सदस्य देवराज गरगटे यांनी समाजसेवक व उद्योजक रुपेश कोकाटे यांच्यासमवेत केली. पाहणीदरम्यान पुलाच्या कठड्यांमध्ये आणि बाजूच्या संरक्षक भागांमध्ये उगवलेल्या झाडांची मुळे खोलवर गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी श्री. गरगटे यांनी संबंधित जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्येकडे वेधत जि. प . सदस्या पूजा निकम यांच्या सदर बाब निदर्शनात आणून पुलावरील उंबर, पिंपळ व इतर झाडे मुळासकट काढून टाकण्याची मागणी केली. तसेच पुलाची संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि नियमित देखभाल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुलावरील वाढलेल्या झाडांमुळे पुलाला अक्षरशः वेढा पडला आहे. ही झाडे वेळेत हटवली नाहीत तर भविष्यात पुलाच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून पुलाला मोकळा श्वास द्यावा,” अशी मागणी देवराज गरगटे व रुपेशजी कोकाटे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवित पुलाची तातडीने साफसफाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुलावरील वाढलेली झाडे आणि झुडपे हटवून संरक्षक उपाययोजना केल्यास या महत्त्वाच्या मार्गाचे आयुष्य वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.