मंडणगड प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संस्थेचे चिटणीस अभिजीत गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रा. प्रभाकर भालके यांनी महात्मा गांधी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षक प्रमोद जाधव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात अभिजीत गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या शैक्षणिक विचारांसह असहकार चळवळ, सत्याग्रह, सत्य व अहिंसेच्या तत्त्वांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक शांताराम बैकर, शिक्षण प्रतिनिधी स्मिता भोसले, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विठ्ठल केंद्रे, महेश गिरी यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल केंद्रे यांनी केले.












