चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव वेतकोंडवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील सीताराम बोलाडे (३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बोलाडे यांना दारूचे व्यसन जडले होते. गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत घरात इतर कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील पडवीच्या लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सुनील यांना मृत घोषित केले.या प्रकरणी मयताचे बंधू पांडुरंग सीताराम बोलाडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या खबरीवरून चिपळूण पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.












