कविता पाठांतर, कथाकथन, समूहगीत गायन, वक्तृत्व स्पर्धांसह हिंदी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
चिपळूण (प्रतिनिधी) : हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे हिंदी पंधरवडा विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी हिंदी भाषेच्या महत्त्वावर भाष्य करताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे म्हणाले, “भारत देशाची हिंदी ही अग्रगण्य भाषा असून, ही भाषा देशातील अनेक लोकांच्या संवादाचा प्राणवायू आहे.” विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा अधिकाधिक वापर करून तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेची ओळख करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. हिंदी पंधरवडानिमित्त विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व समजावे, यासाठी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका गौरी शितोळे व प्रेरणा कदम यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदी भाषा दिनानिमित्त कविता पाठांतर, कथाकथन, समूहगीत गायन आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कविता पाठांतर स्पर्धेत शुभम डेरवणकर प्रथम, गौरी वासकर व मिंसा तांबे विभागून द्वितीय, तर स्वराज राठोड व हर्षद राडे विभागून तृतीय क्रमांक मिळविला. कथाकथन स्पर्धेत दुर्वेश साळवी प्रथम, स्वरा कुंभार द्वितीय, तर अवनी कानसे हिने तृतीय क्रमांक पटकावला. समूहगीत गायन स्पर्धेत इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब’, इयत्ता आठवी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’, तर इयत्ता नववी क च्या विद्यार्थ्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर करून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
‘हिंदी भाषेचे महत्त्व’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आर्या चव्हाण प्रथम, श्रावणी राठोड द्वितीय, तर आर्या जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. हिंदी पुस्तक प्रदर्शन ठरले आकर्षण हिंदी पंधरवड्याचे औचित्य साधून विद्यालयात हिंदी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना हिंदीतील उपन्यास, कथा, नाटक, एकांकिका तसेच हिंदी भाषेतील विविध साहित्यिक पुस्तकांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हिंदी साहित्याविषयी जाणून घेतले. पुस्तक प्रदर्शनासाठी विद्यालयाच्या ग्रंथपाल अनुष्का काजरोळकर यांनी विशेष सहकार्य केले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदी विषयाच्या विभाग प्रमुख गौरी शितोळे, अमित साळवी, प्रेरणा कदम, समृद्धी कदम, दिशा विचारे व मंगेश दाते यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा पोकळे हिने, तर आभार प्रदर्शन वसुधा जयस्वाल हिने केले. हिंदी भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी विद्यालयाने राबविलेल्या या विविध उपक्रमांचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी कौतुक केले.












