माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांची असणार उपस्थिती..
वेंगुर्ले : दाजी नाईक
शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा नाट्योत्सव वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार श्री. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*विज्ञान आणि समाज’ नाट्योत्सवाचे मुख्य विषय*
यावर्षीच्या विज्ञान नाट्योत्सवाचा मुख्य विषय ‘विज्ञान आणि समाज’ असा ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत विद्यार्थी खालील उपविषयांवर नाट्य सादरीकरण करणार आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता : मित्र, साधन की धोका, इलेक्ट्रिक वाहने : पुढचा मार्ग, आंतरतारकीय अधिवास / अंतराळातील मानवी वस्ती आणि महासागराचे पुनरुज्जीवन – पिढ्यांचे जतन याचा समावेश आहे.
सकाळी ८.०० वा.: नाव नोंदणी, ९.३० वा. महोत्सवाचा भव्य उद्घाटन समारंभ, १०.३० वा.: प्रत्यक्ष नाट्य सादरीकरणास प्रारंभ, दुपारी १.३० वा.: भोजन अवकाश, दुपारी २.०० वा.: नाट्य सादरीकरण (उत्तरार्ध) सायंकाळी ५.०० वा. बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.या विज्ञानावर आधारित नाट्यमहोत्सावास आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.













