मोहिमेत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वैभववाडी प्रतिनिधी :
महात्मा गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी वैभववाडी शहरात स्वच्छतेचा एल्गार करण्यात आला. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पुढाकाराने, अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सहकार्याने तसेच स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या सहभागाने शहरातील बाजारपेठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शाळकरी मुले, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “संपूर्ण वैभववाडी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायतीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अशा स्वच्छता मोहिमांमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी स्वीकारून स्वच्छतेसाठी सहकार्य करावे.”
स्वच्छता मिशनचे समन्वयक तथा पत्रकार गणेश जेठे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर वैभववाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, निवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातील नागरिकांना पत्रके वाटून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच आनंदी रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थिनींचीही लक्षणीय उपस्थिती होती. दत्त मंदिर परिसरात पुन्हा स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता पथक तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरातील कचरा साफ केल्यानंतर वैभववाडी पोलीस ठाणे परिसरातही स्वच्छता करण्यात आली.
या वेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ परिसर स्वच्छतेच्या संदेशाने दुमदुमून गेला.
सुमारे दीड ते दोन तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती. यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, नायब तहसीलदार सचिन कदम, माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर, अक्षता जैतापकर, महेश संसारे, सुभाष रावराणे, नंदकुमार रावराणे, रणजीत तावडे, उत्तम सावंत, विनायक पाताडे, अनंत राणे, विजय जामदार, अनिल मेस्त्री, पत्रकार संजय सावंत, महेश रावराणे, अश्विनी पेडणेकर, संजय शेळके, गुरु सावंत, तुषार नेवरेकर, रोहित मोंडकर, प्रदीप राणे, शेख सर, सतीश घाडी, मोहन पडवळ, मारुती कांबळे, स्वच्छता अधिकारी राघव सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक आणि स्वच्छताप्रेमी सहभागी झाले होते.













