चिपळूण (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे रक्षण व संतुलन राखण्यास निसर्गातील वन्य प्राणी, पक्षी तसेच वृक्षसंपदा महत्त्वाची आहे. भविष्याचा विचार होऊन माणसाने निसर्गातील या सर्व घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याच्या भावना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी शुक्रवारी चिपळूण येथील वन विभागाच्या कार्यक्रमात व्यक्त केल्या. जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त चिपळुणातील वन विभागाच्या सहकार्याने कै. निलेश बापट कलादालनात सृजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री लक्ष्मी यांच्या हस्ते विविध उपक्रमांना सुरुवात झाली.
यावेळी दालनात उभारण्यात आलेल्या वन्यजीव तसेच वृक्षसंपदेसहीत निसर्गाची माहिती असलेली पुस्तके व ग्रंथालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच वन्यजीव तसेच रानभाज्या, वृक्षसंपदा, पक्षी आदी निसर्गातील घटकांची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई यांच्यासह जिल्ह्यातील वन विभागाचे प्रमुख अधिकारी व निसर्गप्रेमी भाऊ काटदरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री लक्ष्मी यांनी सांगितले की, वन विभागाची जबाबदारी वन संरक्षणाची असली तरी जनतेने देखील वन विभागाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाकडे असलेला कर्मचारी वर्ग अपुरा आहे. तरीदेखील कर्मचारी व अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. निसर्गातील विविध घटकांमध्ये वन्यप्राणी, पक्षी तसेच वृक्षसंपदेचा मानवी जीवनाला मोठा आधार आहे. निसर्गातील हे सर्व घटक पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम करतात. यातील एखादा घटक कमकुवत झाला तर त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या या सर्व घटकांचे संवर्धन व संरक्षण करणे हे वन विभागासह प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. केवळ वन्यजीव सप्ताहाच्या काळात उपक्रम घेऊन चालणार नाही. यासाठी कायमस्वरूपी उपक्रम व नियोजन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.













