
सौंदळ रेल्वे स्थानक संघर्ष समिती खा. नारायण राणे यांना निवेदन
राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नव्याने सुरू झालेल्या सीएसएमटी –सावंतवाडी अप-डाऊन रेल्वेगाडीला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा द्यावा, तसेच अन्य गाडयांनाही या स्थानकात थांबा द्यावा अशी मागणी सौंदळ रेल्वे स्थानक संघर्ष समिती व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन नुकतेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे देण्यात आले आहे.
सौंदळ येथे रेल्वे स्थानक असूनही प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानकावर आवश्यक उंचीचे फलाट, छप्पर, विद्युत प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व वॉशरूम, प्रवासी प्रतीक्षालय, स्थानकाला जोडणारा रस्ता आणि वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नव्याने सुरू झालेल्या सीएसएमटी ते सावंतवाडी अप-डाऊन रेल्वेगाडीला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या गाडीला थांबा मिळाल्यास राजापूर तालुक्यातील पूर्व विभागासह पाचल परिसर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनुस्कूरा परिसरातील सुमारे ७० ते ८० गावांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सौंदळ हे आंबा-पाचल, अनुुस्करा, कोल्हापूर या भागांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेले रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सौंदळ स्थानक सोयीचे ठरू शकते. मात्र सध्या सावंतवाडीला जाणाऱ्या गाडीव्यतिरिक्त अन्य गाड्यांना येथे नियमित थांबा नसल्याने प्रवाशांना इतर स्थानकांचा आधार घ्यावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सौंदळ स्थानकाचा सर्वांगीण विकास करावा आणि नव्या सीएसएमटी सावंतवाडी गाडीला तातडीने कायमस्वरूपी थांबा मंजूर करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी सौंदळ रेल्वे स्टेशन संघर्ष समिती चे अध्यक्ष काशिनाथ पाटील, उपाध्यक्ष प्रकाश तळेकर, सेक्रेटरी गजानन पेंडलकर, धोंडू लांजेकर.खजिनदार सचिन घाग. प्रसिद्धी प्रमुख संजय मांजरे, जगदीश राणे. सल्लागार सुनील पाटील, श्रीधर गिरकर, कृष्णा चव्हाण, बाबामिया पिरखान व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी खा. राणे यांनी त्यानंतर सौंदळ स्टेशन संदर्भात असलेल्या प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात आली त्या वेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना बोलून हा प्रश्न मार्गी लावूया असे आपल्याला आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.












