दुर्मिळ विविधरंगी रानफुलांचा अद्भुत बहर
सड्यांवरील ‘अल्पायुषी’ सौंदर्य ; रानफुलांच्या नोंदणी अन् जतनाची गरज
आंबोली । प्रतिनिधी : निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेले एकमेव ठिकाण म्हणजे आंबोली होय! यासोबत जैवविविधतेचा परिपूर्ण ‘हॉट स्पॉट’ म्हणून देखील आंबोली प्रसिद्ध असून प्रत्येक ऋतूत नेहमीच आंबोलीत निसर्गाची अलौकिक अशी किमयाच पहायला मिळते. दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती, जलचर, उभयचर आदींचा सुरक्षित असा अधिवासच आंबोलीत आढळून येतो. सध्या याच जैवविविधतेतील समृद्धीचा मुख्य घटक असलेल्या विविध रंगाच्या नयनरम्य अशा असंख्य रानफुलांनी आंबोली – चौकुळ – गेळे हा परिसरात बहरला आहे.
आंबोली हे जगभरातील पर्यटकांचे ‘मोस्ट फेवरेट वर्षा पर्यटन’ स्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीला भेट देत असतात. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे वर्षा पर्यटनाच्या बाबतीत पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला खरा मात्र सध्या
आंबोली – चौकुळ – गेळे परिसरात शेकडो प्रजातींच्या रंगेबीरंगी रानफुलांचे नयनरम्य देखावेच पाहायला मिळत आहेत. यासोबत अतिशय मनमोहीत करणारे विविध रानफुलांचा सुंगंधही सर्वत्र दरवळलेला अनुभवता येतो.
या रानफुलांतील काही दुर्मिळ रानफुले जसे, टोपली कारवी (७ ते १२ वर्षाने एकदा फुलनारी), सोनारडी, तिरडे, नागफुले, तपकी, सांगाडी, ऑर्किड, गोयल सह शेकडो प्रजातीची तसेच स्थानिक रंजक नावांनी ओळखली जाणारी रानफुले ही आढळून येतात. साधारण ऑगस्ट (शेवट) ते ऑक्टोबर (पहिला आठवडा) या कालावधीतील दरवर्षी रानफुलांचा नयनरम्य बहर हा दिसून येतो. मात्र, आंबोली परिसरातील शेकडो प्रजातींच्या रानफुलांची अद्यापही नोंद झालेली नाही. तर गेली काहीवर्षे आंबोली, चौकुळ व गेळे तसेच सह्याद्री परिसरात फुलझाडांवर सखोल अभ्यास व संशोधन हे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. ऋतुजा कोलते करत असून त्यांनी आंबोली – चौकुळ व गेळे परिसरात सुमारे २०० प्रजातीच्या रानफुलांची पहिलीच नोंद केली होती. तर शेकडो प्रजातीच्या रानफुलांवर अभ्यास आणि नोंद बाकी आहे.
बहुतांश प्रजाती फक्त सड्यावर फुलणाऱ्या
” आंबोली – चौकुळ परिसरातील अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातीचे रानफुले जसे गोफ, कोच, कारवी, ग्लायफोक्लोआ फोर्डिक्युलाटा, ग्लायफोक्लोआ रत्नागिरिका व इतर ५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. तर अश्या प्रजातीं संदर्भात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. ऋतुजा कोलते सांगतात की, वर्षातील बहुतांश काळ ओसाड वाटणाऱ्या कोंकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांवर आत्ता विविधरंगी फुले फुललेली आहेत. यातील बहुतांशी वनस्पती या भागाला प्रदेशनिष्ठ आहेत. यामध्ये अशा पण काही वनस्पती आहेत कि ज्या फक्त साड्यांवरच वाढतात. या फुलझाडांचे अजून एक वैशिठ्य म्हणजे सड्यांवरील अति-टोकाच्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये या वनस्पती आपला जीवनक्रम अल्पावधीत पूर्ण करतात. उदा. तेरडा, गेंद फूल, सीतेची आसवे किंवा कावळ्याचा डोळा, हरणे किंवा सोनतळ, काळी मुसळी, पांढरी मुसळी, आर्किड्स आदी. तसेच सड्यांवरील काही फुलझाडांनी तेथील त्या वातावरणात तग धरून ठेवण्यासाठी आपल्या स्वतःमध्येही काही बदल केलेले असतात जसे की बीज प्रसारण, परागीभवन सह तेथील पोषणद्रवे घेण्यासाठी, ट्यूबर (खोड सदृश्य) ज्यात अन्न साठवणे असे काही विशेष बदल हे केलेले आहेत. ”
दरवर्षी जून पासून ऑगस्ट महिन्यात आंबोलीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस असतो. पावसाळा येथील जैवविविधतेतील सर्व घटकांना नेहमी नवी संजीवनीच देत असतो. आंबोलीत दरवर्षी सुमारे १० हजार मीमी पाऊस हा कोसळतो. सद्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू असून सर्वत्र असंख्य रानफुलांचा बहर आहे. ह्या रानफुलांचे हे अद्भुत नयनरम्य नजारे म्हणजेच निसर्गाची मुक्तहस्ते रंगांची उधळण दिसत आहे. तसेच आंबोली परिसरात आलेले पर्यटन निसर्गाची ही अद्भुत किमया असलेल्या रानफुलांना कॅमेराब्ध करत निसर्गाचा आस्वादच घेत आहेत.
अती दुर्मिळ फुलांच्या प्रजातींची नोंदणी व जतन आवश्यक
आंबोली परिसरात दरवर्षी दुर्मिळ तसेच अतिदुर्मिळ आढळून येणाऱ्या रानफुलांच्या नोंदी झालेल्या नाहीत. तर दरवर्षी ह्या रानफुलांचा अभ्यास करत त्यांची नोंद होने आवश्यक आहे. यातील शेकडो जातीची रानफुले ही वनौषधी म्हणून उपयोगात येणारी आहेत. जी येथीलच परिसरात आढळून येतात. असे काही जून जाणकार व वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे येथील रानफुलांवर संशोधन करत त्यांच्या जतनाचे आतापासूनच प्रयत्न करने काळाची गरज आहे. तर येथे आढळून येणाऱ्या रानफुलांवर संशोधन तसेच नोंद झाल्यास येथे हजारो प्रजातींची रानफुले ही आढळून येवू शकतात. यासाठी ‘आंबोली टुरिझम’ संस्था ही सदर फुलझाडांचे संवर्धन व नोंदी ठेवण्याचे विशेष प्रयत्न देखील आहे.














