Breaking News : राजापूरमध्ये ग्राइंडरचे ब्लेड तुटून युट्यूबर गंभीर जखमी!

ब्लेड जबडा फाडून मेंदूपर्यंत घुसल्याची धक्कादायक घटना; तातडीने उपचारासाठी कोल्हापूरला हलवले

खेड (प्रतिनिधी) : घरातील काम सुरू असताना ग्राइंडरचे ब्लेड तुटून थेट चेहऱ्यावर आदळल्याने महा कोकणचे युट्यूबर जगन्नाथ धोंडू गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरातील गुरववाडी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात काम सुरू असताना अचानक ग्राइंडरचे ब्लेड तुटले आणि अत्यंत वेगाने उडून जगन्नाथ गुरव यांच्या चेहऱ्यावर आदळले. या दुर्घटनेत त्यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, ब्लेड जबडा फाडून मेंदूपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर त्यांना तात्काळ राजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे चालक तौफिक सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णाची प्रकृती लक्षात घेता त्यांनी विलंब न करता जगन्नाथ गुरव यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवले.
ग्राइंडरच्या ब्लेडमुळे झालेल्या या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून, जगन्नाथ गुरव यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.