‘ओंकार’ हत्तीचे दोडामार्ग तालुक्यात पुनरागमन; एका बाजूला ‘फणसाच्या गऱ्यांचे’ स्वागत, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांमध्ये संताप!

​दोडामार्ग | सुहास देसाई  : गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्याबाहेर गेलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्याच्या हद्दीत दाखल झाला आहे. या हत्तीच्या आगमनाने एका बाजूला कौतुक आणि कुतूहल पाहायला मिळत असले, तरी दुसऱ्या बाजूला स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने जाणीवपूर्वक या हत्तीला दोडामार्गच्या दिशेने हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी केला आहे.

​कोलझर, तळकट, झोलबे भागात ‘फणसाच्या गऱ्यांसाठी’ वरात!
​ओंकार हत्ती हा फणसाचे गरे खाण्यासाठी रस्त्यावरून प्रवास करत जंगलाकडे सरकत आहे. कोलझर, तळकट, झोलबे भागात त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. रस्त्यात जागोजागी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले. हत्ती फणसाच्या एवढ्या प्रेमात पडला आहे की, एका एका गऱ्यासाठी तो एक एक पाऊल पुढे टाकत चालत होता. मागे-पुढे ग्रामस्थ आणि मध्ये हत्ती, अशा वातावरणात जणू त्याची वरातच काढली जात होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच ओंकारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने येथे चोख बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी केली जात आहे.
​शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा मीठ; सरपंचांचा वनविभागावर हल्लाबोल

​एकीकडे हे कुतूहलाचे चित्र असले तरी दुसरीकडे हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, वाफोली परिसरात वावरत असताना या हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त केल्या होत्या. आता तो पुन्हा दोडामार्गमध्ये आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
​”सावंतवाडी तालुक्यात हत्तींचा वावर झाला की तातडीने हालचाली करून त्यांना तेथून हटवले जाते आणि दोडामार्गच्या दिशेने वळवले जाते. जर इतर तालुके हत्तींचा त्रास सहन करू शकत नाहीत, तर दोडामार्गवासीयांनी नेमका कोणता अपराध केला आहे? एका तालुक्यातील समस्या दुसऱ्या तालुक्यावर ढकलणे हा उपाय असू शकत नाही.”
— सुरेंद्र सावंत-भोसले (सरपंच, तळकट)
​भीतीचे वातावरण; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

​गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्तींचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीने फुललेल्या बागायती आणि पिके या हत्तींमुळे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून आपल्या शेतांचे रक्षण करावे लागत आहे. ओंकार हत्तीच्या पुनरागमनामुळे गावांमध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा घराबाहेर पडणे देखील धोकादायक बनले आहे.