चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील निरबाडे, खांदाट-पाली, ता. चिपळूण तसेच काडवली, ता. खेड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रामवरदायिनी देवस्थान मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार असून मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दसरा व सीमोल्लंघनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात निरबाडे, पाली, खांदाट तसेच काडवली परिसरातील विविध वाड्यांना जागराची जबाबदारी देण्यात आली असून, संबंधित ट्रस्टी व उत्सव कमिटीच्या माध्यमातून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार असून पाली खालचीवाडी, खांदाट भोईवाडी यांच्यावतीने जागर करण्यात येणार आहे. या दिवशी गोंधळ व भजनाचा कार्यक्रम होईल. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी पाली मधलीवाडी व खांदाट गवळवाडी, मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पाली वरचीवाडी व पाली भुवडवाडी, बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी निरबाडे पश्चिमवाडी व काडवली गजवाडी, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी निरबाडे चौरसवाडी व काडवली काजवेवाडी यांच्यावतीने जागर, गोंधळ, भजन असे कार्यक्रम होतील. १५ ऑक्टोबर रोजी ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी निरबाडे पूर्ववाडी व निर्मळवाडी, शनिवार १७ ऑक्टोबर रोजी काडवली कसुचरवाडी व झगडेवाडी यांच्या वतीने जागर तर गोंधळ व भजन होईल. तसेच सोबत नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील भाविक व रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
रविवार, १८ ऑक्टोबर रोजी काडवली चौरसवाडी व हुमणेवाडी यांच्या वतीने गोंधळ व भजनाचा कार्यक्रम होईल. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी ग्रहयज्ञ आयोजित करण्यात आला असून काडवली कांगणेवाडी, डांगेवाडी तसेच संपूर्ण चारगाव परिसराचा सहभाग राहणार आहे. या दिवशी उत्सव कमिटीचे पदाधिकारी व संबंधित ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडतील. मंगळवार २० ऑक्टोबर रोजी काडवली हिरवेवाडी व निरबाडे देऊळवाडी यांच्या वतीने जागर करण्यात येणार आहे. याच दिवशी दसरा उत्सव व दुपारी २ वाजल्यानंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर नवरात्रोत्सवाची सांगता होईल.
नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री रामवरदायिनी देवीचे दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान मंडळ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी ओटीसाठी लागणारी हिरवी साडी, खण व नारळ यांची व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री रामवरदायिनी देवस्थान मंडळ, मौजे निरबाडे, पाली, खांदाट व काडवली तसेच उत्सव कमिटीचे पदाधिकारी, ट्रस्टी आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
चौकट-
नाचाचा जंगी सामना
शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता नाचाचा जंगी सामना होणार आहे. भानुदास घराण्याचे गुरुवर्य विक्रम केरू साधू दादा यांचे पट्ट्य शिष्य कवी शाहीर गणेश शिंदे यांची सुकन्या कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त कोंडीवली ता. खेड येथील शक्तीवाले शाहीर साक्षी शिंदे गोमले तर रामचंद्र पंडित घराण्यातील विजय राजेंद्र यांचे शिष्य सुमधुर आवाजाचे तुरेवाले शाहीर मुरडे गोठलवाडी येथील रत्नाकर महाकाळ यांच्यात हा सामना होणार आहे.













