संगमेश्वर तालुक्यात जलस्रोतांचे बळकटीकरण करा- आमदार शेखर निकम

देवरूख पंचायत समिती येथे संगमेश्वर तालुक्याची पाणीटंचाई कृती आराखडा बैठक संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती असून संगमेश्वर तालुक्यातही पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आत्तापासूनच उपाययोजना सुरू करा, ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई होऊ शकते अशा गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठीचा आराखडा लवकरच तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवा, जलस्रोतांचे बळकटीकरण करा, अशा सूचना संगमेश्वर-चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी संगमेश्वर तालुक्याच्या पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.

देवरूख पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर तालुक्याची पाणीटंचाई कृती आराखडा बैठक पार पडली. या बैठकीत आ. शेखर निकम यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला. ज्या गावांमध्ये पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे अशा गावांसाठी पाणीपुरवठ्यासाठीच्या उपाययोजनांचा विस्तृत आराखडा तयार करून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठवा.

भूगर्भातील पाण्याची पातळी फार कमी होणार नाही यासाठी उपाययोजना करा, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करा अशा सूचना त्यांनी केल्या. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वात आधी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ. निकम यांनी सांगितले. या बैठकीला सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, जि. प. सदस्य प्रमोद अधटराव, जि. प. सदस्या नेहा माने, माजी जि. प. अध्यक्ष संतोष थेराडे, पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, सर्व विभागांचे अधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.