चिपळुणातील प्रशासकीय, राजकीय कारभार इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटरमधे
चिपळूण (प्रतिनिधी) : नगरपरिषदेची ब्रिटीशकालिन शेंगदाणा इमारत लवकरच इतिहासजमा होणार आहे. सध्या या इमारतीतील प्रशासकीय व राजकीय कारभार इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटरमध्ये हलवण्यास सुरुवात झाली आहे. इमारत पाडण्यासाठी ६ निविदा आल्या असून दोन दिवसात ठेकेदाराची निवड होणार आहे. त्यानंतर इमारत पाडण्याचे काम हाती घेतले जाणार असून ते पूर्ण होताच नव्या इमारतीच्या कामालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता केवळ इमारतीच्या आठवणी उरणार आहेत.
ब्रिटीश राजवटीत नगराचा विकासगाडा सुरळीत राखण्यासाठी १६ डिसेंबर १८७६ साली तत्कालीन राजवटीने नगर परिषदेची स्थापना केली. स्वर्गीय डिंगणकर यांच्या बापटआळी येथील घरात नगर परिषदेचे कार्यालय होते. शहरातील त्यावेळचे मोठे शेतकरी व जमीनदार रंगोपंत नाना पत्की पहिले अध्यक्ष झाले. काही वर्षांनी जुना भैरी देवस्थानसमोर अर्धा भाग कन्याशाळा व अर्धा भाग नगर परिषद अशी इमारत बांधण्यात आली. बाजूला दवाखाना सुरू करण्यात आला. काही वर्षे येथे कारभार चालल्यानंतर १९४० साली केवळ ६५ ‘हजार रुपये खर्च करून मजबूत अशी इमारत बांधण्यात आली. ज्या इमारतीत आजही कारभार सुरू आहे. त्यावेळी शेंगदाणे व्यापार मोठा होता. त्याच्या कराच्या पैशावर इमारत झाल्याने या इमारतीस शेंगदाणा इमारत असे नाव पडले. त्यानंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेल्या प्रशासकीय कारभारामुळे बाजूलाच नवी इमारत बांधण्यात आली. मात्र ती या इमारतीच्या अगोदरच धोकादायक ठरल्याने काही महिन्यांपूर्वीच जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या प्रशासकीय व राजकीय कारभार जुन्या शेंगदाणा इमारतीत सुरू आहे.
याच जागी नवी इमारत बांधण्यासाठी नगरपरिषदेने १२ कोटी ४७ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून इमारत उभारणीसाठीच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. तसेच मंजूर निधीपैकी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे दुसरी इमारत पाडण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार ६ निविदा प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाला इमारतीमधून ३ लाख ६१ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे जी कपंनी तितकी किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम देईल तिला हे काम दिले जाणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे. या जागी नवी इमारत बांधण्याचा ठेका एका कंपनीला देऊन झाला असून इमारत पाडून होताच नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
चौकट-
कोरीव दगड जतनाचा विसर
शेंगदाणा इमारतीला पूर्वीच्या काळातील कोरीव दगड अधिक आहेत. त्यामुळे इमारत पाडताना कोरीव दगड कोठेही न टाकता नव्या इमारतीत खास जागा करून तेथे त्यांचे जतन करण्यावर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमत झाले होते. मात्र निविदेचा विचार करता हे दगड, लोखंड, पत्रे व अन्य साहित्य ठेकेदारच नेणार आहे, त्यामुळे दगड जतन करण्याचा विसर नेमका का पडला, हे दगड किमती असून त्यातून लाखो रुपये मिळणार असताना नगरपरिषदेला केवळ ३ लाख ६१ हजार रुपयांचीच अपेक्षा का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.













