शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र
चिपळूण (प्रतिनिधी) : खुप अभ्यास करा…मनसोक्त खेळा आणि आपले कलागुण जोपासा असा कानमंत्र शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘चला शाळेत जाऊ या’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादासाहेब भुसे यांनी रत्नागिरी दौऱ्या दरम्यान चिपळूण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कोंडमळा नं. १ या शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला सुप्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांचे दुखःद निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच कला व क्रीडा नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जि.प.पू.प्रा.आदर्श शाळा मांडकी खुर्द शाळेतील दुर्गा अनंत शिगवण आणि पुर्वी अजय मादगे ( इ.७वी) तसेच जि. प.आदर्श शाळा कुशिवडे शिगवणवाडी शाळेतील वेदिका दिनेश वणगे ( इ.४थी) त्याचबरोबर कोंडमळा नं.१ शाळेतील स्वरा विजय घाणेकर (गायन कला) आणि आर्या अंकुश राडे (क्रीडा नैपुण्य) या विद्यार्थिनींचा समावेश होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरूजनांचादेखील सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जि.प.मांडकी खुर्दचे रविंद्र घाणेकर, जि.प. कुशिवडे शिगवणवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रविण शिवडे आणि सतिश सावर्डेकर यांचा विशेष सत्कार शिक्षणमंत्री ना. दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ना. भुसे यांनी खुप अभ्यास करा…खुप मेहनत करा…मनोसक्त खेळा त्याचबरोबर आपले कलागुण जोपासा असा कानमंत्र दिला. त्यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री. मेंगाणे, विविध योजनांचे अधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, जि.प.शिक्षण समितीचे सभापती नंदकुमार मुरकर तसेच जि.प.सदस्या सौ.पूजा निकम, पंचायत समितीचे सदस्य शौकत माखजनकर, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, सावर्डे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी देसाई, चिपळूण प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.पटेल, शाळा व्यवस्थापन समिती कोंडमळा नं. १ चे अध्यक्ष विनोद घाणेकर, शिक्षण तज्ञ्ज दिनेश विचारे, त्याबरोबर मांडकी खुर्दचे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ श्रीराम घाणेकर, कोंडमळा नं. १ चे उपक्रमशील मुख्याध्यापक संतोष कदम, मांडकी खुर्दचे उपक्रमशील शिक्षक रवींद्र घाणेकर, कुशिवडे शिगवणवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रविण शिवडे आणि शिक्षक बॅकेचे तज्ज्ञ संचालक आणि शिक्षक सतिश सावर्डेकर तसेच ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
मार्गदर्शनानंतर शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी शालेय गुणवत्तेची पडताळणी करून समाधान व्यक्त केले. तसेच शालेय परिसराची पाहणी करून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. शालेय प्रांगणात सर्व अधिकारी- पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, पालक ,ग्रामस्थ यांच्या सोबत संवाद साधून एकत्रित फोटो काढले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संदेश सावंत यांनी केले.













